वाळूज परिसरात एका आठवड्यात तिसऱ्यांदा दुकाने फोडली, मंगळवारी रात्री सहा दुकानांवर मारला डल्ला

Foto

औरंगाबाद – वाळूज महानगरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच असून एका आठवड्यात दुकान फोडण्याची ही तिसरी घटना आहे. विशेष म्हणजे एकाच रोडवर तीन दिवसांत चोरट्यांनी दुसऱ्यांदा दुकान फोडून लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे. याशिवाय वाळूजमध्ये दोन दुचाकींना माथेफिरुंनी पेटवून दिले आहे. यामुळे चोरांना पोलिसांचे भयच राहिले नाही, अशा प्रतिक्रिया नाकरिकांमधून व्यक्त होत आहेत. 

कुठे फोडली दुकाने

वाळुज परिसरातील कमळापूर रोडवरील सहा दुकानांचे शटर उचकटून चोरांनी रोख रकमेसह लाखोंचा माल लंपास केला आहे. छोट्या व्यापाऱ्यांची दुकाने फोडून चोर दुकानातील मिळेल तो माल लंपास करत आहेत. या चोरांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. दुसरीकडे याच परिसरात दोन दुचाकींना पेटवून देण्यात आले आहे. ही घटना देखील मंगळवारी रात्री घडली आहेे. सततच्या चोऱ्या आणि आता दुचाकी जाळण्याच्या प्रकाराने पोलिसांची रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी पुन्हा एकदा केली आहे. 

सहा दुकाने फोडली

दत्तनगर फाटा येथील आशापुरा फुटवेअर, जयभवानी ईलेक्ट्रिकल्स, श्रीकृष्ण मोबाईल शॉपी, श्री गणेश मोबाईल शॉपी या दुकानांचे शटर उचकटून चोरांनी रोख रकमेसह महागड्या मोबाईलवर डल्ला मारला आहे. त्यासोबतच कमळापूर रोडवरील शहिद भगतसिंग शाळेसमोरील अभय ज्वेलर्स आणि प्रांजल मेडिकलमधील किंमती साहित्य चोरांनी लंपास केले आहे.

एकाच रात्री सहा दुकाने फोडून चोरांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्री गणेश मोबाईल शॉपीमधून महागड्या मोबाईलसह २५ हजार रुपयांची रोख रक्कमही गायब आहे.


तीन दिवसांपूर्वी याच मार्गावरील दोन मेडिकल फोडले

वाळूज परिसरातील कामळापूर रोडवर शरद बोडखे यांचे गुरुकृपा मेडीकल आणि या दुकानाच्या काही अंतरावर असलेले बंडू अमके यांचे विजय मेडीकल या दोन्ही औषधी दुकानांना चोरट्यांनी रविवारी रात्री लक्ष केले होते. या दोन्ही मेडीकलचे शटर उचकटून गल्ल्यामधील रोख रकमेसह औषधी, सौंदर्य प्रसाधने यावर चोरांनी डल्ला मारला होता. याआधी तुर्काबाद खराडी येथे किराना दुकान फोडून तेल, तुपासह किराना सामान चोरांनी लंपास केले होते.